
बसस्टँडवर सोनं चोरणाऱ्या दोन महिला अटकेत, 8 गुन्ह्यांची उकल!
लातूर :बसस्थानकांवरील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुरूड-अकोला बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून विविध बसस्थानकांवरील चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित तब्बल 10 लाख 06 हजार रुपये किमतीचे 78.15 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे लातूर, अहमदपूर व भादा येथील चोरीच्या 08 गुन्ह्यांची उकल झाली आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक बसस्थानकांवरील चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेत होते. दि. 2 ऑक्टोबर रोजी पथकाला मुरूड-अकोला बसस्थानक येथे दोन महिला संशयास्पदरीत्या थांबलेल्या असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खात्री करून पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली. त्यांच्या जवळील पिशवीत हिरवट रंगाच्या स्कार्फमध्ये गुंडाळून ठेवलेले सोन्याचे दागिने आढळून आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या महिला आरोपींमध्ये स्वाती उर्फ रविना उमाकांत तपसाळे, वय 35 वर्षे, रा. आष्टा जहांगीर, ता. उमरगा, जि. धाराशिव आणि महादेवी सर्जेराव देडे, वय 40 वर्षे, रा. न्यू जय नगर, लातूर असे असून त्यांच्याकडून गांधी चौक पोलीस ठाणे 2 गुन्हे, अहमदपूर पोलीस ठाणे 4 गुन्हे, भादा पोलीस ठाणे 2 गुन्हे मधील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, रसूल पठाण, विनोद चलवाड, प्रशांत स्वामी, सुरेश कलमे, राजेश कंचे, गोविंद येलमटे, आनंद हल्लाळे, प्रेमदास राठोड, गोविंद भोसले, तुळशीराम बरूरे, सुरेखा मदने, अंजली गायकवाड, चंद्रकांत केंद्रे यांच्या पथकाने केली.
Latur, Latur | Oct 3, 2026