SP ऑफिस समोरच गुंडागर्दी; चहा सेंटरची तोडफोड, मारहाण CCTV मध्ये कैद
विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात NCR दाखल*
लातूर, दि. 4 -शहरातील अत्यंत वर्दळीच्या आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील आयशा कॉलनी परिसरात एका चहा सेंटरमध्ये घुसून तोडफोड व मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
दि. 3 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी* दोन तरुण दुचाकी क्रमांक MH24 CE 4917 थेट हॉटेलच्या किचनमध्ये घुसवतात. CCTV फुटेजनुसार, पांढरा प्रिंटेड शर्ट घातलेल्या तरुणाने हॉटेल कामगाराला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने किचन ओट्यावरील भांडी, कढई फेकून मोठे नुकसान केले.
यावेळी हॉटेलमधील महिला व इतर कामगारांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही ढकलून देत एका कामगाराला मारहाण करण्यात आली. सुमारे 10 मिनिटे हा गोंधळ सुरू होता.
या प्रकरणी फिर्यादी अलीम अहमद शेख (वय 51, रा. आयशा कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात *NCR क्र. 1425/2026* दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 352, 351(2), 351(3), 324(4) अन्वये नोंद करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरच असा प्रकार घडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले असून पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस करत आहेत.
Latur, Latur | Oct 4, 2026