सटवाई मूर्तीच्या संवर्धनातून उलगडले सरस्वतीचे स्वरूप
माणकेश्वर (ता. भूम) येथील मंदिरातील सटवाई देवीच्या मूर्तीवरील शेंदूर रासायनिक प्रक्रियेद्वारे काढल्यानंतर मूर्तीचे मूळ शिल्पवैशिष्ट्य समोर आले आहे. या प्रक्रियेचा रासायनिक जतन-संवर्धन अहवाल मिळण्यास विलंब झाल्याने गणेश महाराज अंधारे यांनी मंदिर परिसरात सुरू केलेले उपोषण बुधवारी (ता. २३) पुरातत्त्व विभागाचा अहवाल प्रशासनाकडून प्राप्त झाल्यानंतर मागे घेतले.
माणकेश्वर येथील ऐतिहासिक महादेव मंदिर परिसरातील सटवाई देवीच्या मूर्तीवर अनेक वर्षांपासून शेंदुराचे थर साचले होते. पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रित रासायनिक प्रक्रियेद्वारे शेंदूर, सिमेंट व अन्य थर काढण्यात आले. त्यामुळे मूर्तीवरील मूळ कोरीवकाम व सूक्ष्म शिल्पवैशिष्ट्ये स्पष्ट झाली आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागाच्या सहायक संचालक (पुरातत्व) कार्यालयाने ९ जुलै २०२६ ला याबाबतचा सविस्तर अहवाल वरिष्ठ पुरातत्त्व अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. अहवालानुसार मूर्ती आसनस्थ व चतुर्भुज असून तिची उंची सुमारे ११० सेंटीमीटर व रुंदी ७० सेंटीमीटर आहे. डोक्यावर किरीट मुकुट, मागील बाजूस प्रभावळ, मकरतोरण व कीर्तिमुखाची रचना आढळते. मूर्तीवरील भग्न हात, आयुधे व पायाची बोटे यांची पुनर्निर्मिती करताना मंदिराच्या बाह्य भिंतीवरील यादवकालीन शिल्पांचा संदर्भघेण्यात आला. वीणा, अक्षमाला, अंकुश, वेद अथवा वही आणि हंस यासारख्या लक्षणांमुळे मूर्तीचे सरस्वती देवीशी संबंधित मूर्तिशास्त्रीय साम्य असल्याचे अहवालात नमूद आहे.
.सटवाई देवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढण्याची रासायनिक प्रक्रिया होऊन तीन महिने उलटून गेल्यानंतरही पुरातत्त्व विभागाकडून अहवाल आलेला नसल्याने उपोषण सुरू केले होते. आज अहवाल प्राप्त झाला असून, त्यात सरस्वती स्वरूप देवीचे रूप असल्याचे नमूद आहे.
गणेश महाराज अंधारे
Dharashiv, Dharavshiv | Sep 26, 2026