उदगीर तालुक्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती; केवळ ६०% पाऊस, दोन प्रकल्प कोरडे - तहसीलदार राम बोरगावकर
उदगीर (लातूर): महाराष्ट्रभर दुष्काळाची परिस्थिती असून त्याचा मोठा फटका उदगीर तालुक्यालाही बसला आहे. आतापर्यंत केवळ ६० टक्केच पर्जन्यमान झाले असून तालुक्यातील १३ पैकी २ प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत, अशी माहिती तहसीलदार राम बोरगावकर यांनी दिली.
उदगीरची जीवनवाहिनी असलेल्या तिरू आणि अन्य एका मोठ्या प्रकल्पात केवळ डेड स्टोरेज शिल्लक असून पिण्याच्या पाण्यासाठी ते राखीव ठेवण्यात आले आहे. उर्वरित लघु प्रकल्पांमध्ये केवळ ३० ते ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
पाणी उपशावर कारवाई सुरू
पाणीसाठे संरक्षित करण्यासाठी महसूल, पोलीस, MSEB, ग्रामविकास विभागाचे संयुक्त पथक गठीत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पाणी उपसा करू नये म्हणून समुपदेशन करण्यात येत आहे, तर न ऐकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त करून गुन्हे दाखल करण्याचा इशाराही तहसीलदारांनी दिला आहे.
टँकर आणि अधिग्रहण
सध्या तालुक्यात ग्रामीण भागात उन्हाळ्यात अधिग्रहित केलेल्या २२ विहिरी/बोअर पैकी ७ ठिकाणी अधिग्रहण चालू आहे. नवीन मागणी आली नसली तरी डिसेंबरनंतर पुन्हा अधिग्रहण करावे लागणार असून खाजगी जलसाठ्यांची ओळख पटवून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
नागरिकांना आवाहन
नळाला येणारे पाणी जपून वापरा, रस्त्यावर पाणी वाहून जाऊ देऊ नका, असे आवाहन बोरगावकर यांनी केले आहे. पॅनिक होऊ नका, प्रशासन तुमच्या सोबत आहे. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्या सूचनेनुसार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याकडून शेतात जाऊन १०० टक्के पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
Latur, Latur | Oct 1, 2026