गोंदियात के.टी.एस. रुग्णालयात ११ वा ‘आयुर्वेद दिन’ उत्साहात संपन्न
4k views | Gondia, Maharashtra | Sep 25, 2026 गोंदियात के.टी.एस. रुग्णालयात ११ वा ‘आयुर्वेद दिन’ उत्साहात संपन्न ‘सेवा संकल्प’ अभियानातून ज्येष्ठांसाठी मोफत आरोग्य तपासणी; आयुष केंद्रांमध्ये योग, ध्यान व वृक्षारोपण उपक्रम गोंदियाच्या के.टी.एस. सामान्य रुग्णालयातील आयुष विभागात ११ वा ‘आयुर्वेद दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. २३ सप्टेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी ‘सेवा संकल्प’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प करण्यात आला. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प’ अभियान राबविण्यात येत असून, याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच आयुष वेलनेस सेंटर आणि आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये वृक्षारोपण, योगासने आणि ध्यानाचे विशेष सत्र घेण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी. के. पटेल होते. सह-जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, जिल्हा विस्तार व माहिती अधिकारी विजय आखाडे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मीना वट्टी यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. महेंद्र संग्रामे यांनी आभार मानले. आयुष विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.